सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण
वैश्वि्क उष्णतेमध्ये होणारी वाढ, हवामानातील बदल याबाबत गांभीर्याने घेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने विविध विभाग आणि जनतेच्या सहभागातून 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या उद्दिष्टामध्ये सन 2018 मध्ये 13 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यासाठी विविध 26 विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शासनाच्या या आवाहनास प्रतिसाद म्हणून सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूडच्या प्रांगणात पर्यावरण संवर्धन व संसाधन केंद्राच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार म्हणाले की, गेल्या काही वर्षात वृक्षतोड मोठया प्रमाणात झाल्याने त्याचा विपरीत परिणाम जनसामान्यांवर, येथील वातावरणावर झालेला दिसून येत आहे. वृक्षतोड होतानाच वृक्षलागवड करून त्याची जोपासना केली जात नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. महाराष्ट्रात भीषण दुष्काळ सध्या जाणवू लागला आहे. दुष्काळ हा निसर्गनिर्मित नसून मानवाच्या नियोजन शून्य कृतीचा परिणाम आहे. वृक्ष आणि वन यांच महत्व संत तुकाराम महाराजांनी चारशे वर्षापूर्वी त्यांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगाच्या माध्यमातून सांगीतले आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली तर महाराष्ट्रात भेडसावू लागलेले संभाव्य धोके रोखण्यात मानवाला यश मिळेल असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन कॉलेज मधील पर्यावरण संरक्षण व संवर्धन केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना विभागा मार्फत केले होते. या वेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार, उपप्राचार्य डॉ. शिवाजीराव होडगे, समन्वयक प्रा. दादासाहेब सरदेसाई, डॉ. के. एस. पवार, प्रा. दीपक साळूखे,डॉ. उदय शिंदे, प्रा. विनोद प्रधान, प्रा. राहुल कांबळे इतर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.